लोणी काळभोर : फुरसुंगी रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यातून निघालेला अवजड ट्रक लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती परिसरात रामदरा रस्त्यावर शुक्रवारी (ता. ७) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास बंद पडल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. या घटनेमुळे रामदरा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला असून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, कामगार आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

सकाळच्या गर्दीच्या वेळेत ट्रक रस्त्यातच बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाला, तर अनेक नोकरदारांना वेळेत कार्यालय गाठणे अशक्य झाले. स्थानिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर लोणी काळभोरचे प्रशासक सरपंच नागेश काळभोर यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली. स्थानिक नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. उलट, स्थानिक शेतकऱ्यांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी रेल्वे प्रशासन तक्रार अर्ज देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“स्थानिकांना रोजच्या रोज त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते अवजड वाहतुकीसाठी सक्षम नसतानाही ट्रकची वाहतूक सुरू आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला, तर येथून एकही अवजड वाहन जाऊ देणार नाही,” असा थेट इशारा नागेश काळभोर यांनी प्रशासनाला दिला.
रामदरा रस्त्यावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.







