पुणे : पुण्यात काल शुक्रवारी (ता. १४ ) अवघ्या दोन तासांत रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. दीड ते दोन तास सरु असलेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आता येत्या ४८ तासांतही मुसळधार पावसाचा जोर पुणे शहरासह जिल्ह्यातही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पुणेकरांना पुन्हा जोरदार पाऊसाचा सामना करावा लागणार आहे.
तसेच पुण्यात आज आणि उद्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाच्या सरी अजूनही बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे.
दरम्यान, पुढील तीन दिवसांत पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परतेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागात १२ ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.