लोणी काळभोर, (पुणे) : थेऊरसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महातारीमाता मंदिरात सोमवारपासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. थेऊर येथील महातारीमाता ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव २०२२ आयोजित केला आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे नवरात्रोत्सव साजरा करता आला नाही, परंतु या वर्षी शासनाने निर्बंध शिथिल केले असल्याने, नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. २००० सालापासून थेऊर येथील महातारीमाता मैदानात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पूर्व हवेलीत सर्वात जुने नवरात्रोत्सव मंडळ म्हणून या महातारीमाता ग्रामविकास प्रतिष्ठानकडे पाहिले जाते. या मंडळाच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात थेऊरचे माजी सरपंच व प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब काकडे यांनी केले असून, सद्यस्थितीत या नवरात्रोत्सवाचे सर्व आयोजन व नियोजन प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांच्या व सहकार्यातून नवरात्र महोत्सवाचे मुख्य संयोजक नवनाथ काकडे करीत आहेत.
नवरात्रोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे, तर महाराष्ट्रातून अनेक भक्तगण येतात. २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत मोठ्या उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. लहान मुलांना हा उत्सव म्हणजे पर्वणीच असून, भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
दरम्यान, नवरात्रोत्सवाचे आयोजन व विशेष सहकार्य चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त दत्तात्रय कुंजीर, सुदाम काकडे, माजी सभापती चंद्रभागा काकडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे, संजय काकडे, गणेश गावडे, जयश्री कुंजीर, मनीषा कुंजीर, पल्लवी साळुंखे, चंद्रभागा शिर्के यांनी केले आहे.