पुणे : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्यात तापमानांची नोंद वाढत असताना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.त्यानुसार राज्याच्या यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १२) विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, पश्चिम राजस्थानपासून उत्तर विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालींमुळे विदर्भात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ आकाश आहे.
दरम्यान कमाल तापमानात काही अंशी वाढ-घट होत असली तरी उन्हाचा चटका कायम आहे.आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.