योगेश मारणे
शिरूर : पिंपळसुटी (ता.शिरूर) येथील एका लहान चिमुकलीवर बिबट्याने आज (दि.२४) सायंकाळच्या सुमारास हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर नागरीक व वन विभागाचे कर्मचारी यांनी सुमारे दोन तास मुलीची शोधाशोध केली. त्यानंतर लहान मुलीचा मृतदेह आज रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सापडून आला आहे. रक्षा अजय निकम (वय – ४ वर्ष,रा.पिंपळसुटी,ता.शिरूर,जि.पुणे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संध्याकाळच्या वेळेस महावितरणची वीज गेल्यामुळे आई आपल्या एका लहान मुलाला घराच्या बाहेरील ओट्यावर जेवण भरवत असताना दुसरी चार वर्षाची लहानगी मुलगी बाहेर खेळत होती. दरम्यान, आईच्या समोर बिबट्याने चार वर्षाच्या लहानगीला जबड्यात पकडून फरफटत ओढत नेले. त्यानंतर नागरीक व वन विभागाचे कर्मचारी यांनी मुलीची शोधाशोध केली असता त्या लहान मुलीचा मृतदेह आज रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.
मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील घटनांशी पिंपळसुटी (ता.शिरूर)येथील घटनेचे साधर्म्य असून, या घटनेतील रक्षा निकम या लहान मुलीचे शीरही बिबट्याने धडावेगळे केले आहे. त्यामुळे ज्या बिबट्याने मांडवगण फराटा परिसरात लहान मुलांचे बळी घेतले त्याच नरभक्षक बिबट्याने हा हल्ला केला असल्याची शंका वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
रक्षा या लहान मुलीचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून, पुढील कार्यवाही व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे. शिरूर तालुक्यात बिबट्याचे लहान मुलांवर होणारे हल्ले ही बाब अतिशय दुर्दैवी व धक्कादायक आहे. अजून किती बळी गेल्यावर वन विभाग व शासनाला जाग येणार? अशी विचारणा शिरूरच्या पूर्व भागातील नागरिकांमधून केली जात आहे.