जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी मामा आल्याने बाहेरून चायनीज आणण्यासाठी निघालेल्या तिघांना डंपरने धडक दिली. हे तिघेही दुचाकीवरून जात होते. यात नऊ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. तर त्याची बहीण व मामा हे जखमी झाले आहेत. दरम्यान अपघात घडल्यानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कालिंका माता चौक परिसरात झालेल्या या अपघातात अयोध्यानगरातील योजस धीरज बऱ्हाटे (वय ९) या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. योजस बऱ्हाटे हा आई- वडिल व बहीण भक्ती बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत वास्तव्याला होता. दरम्यान बुधवारी भादली येथील त्याचा मामा योगेश बेंडाळे हा भेटण्यासाठी आला होता. भाच्यासोबत घरात थोडा वेळ घालविल्यानंतर मुलांनी हट्ट केला. यामुळे मामा-भाचे चायनीजचे पार्सल आणायला घराबाहेर पडले होते.
… आणि घात झाला
घरापासून थोड्याच अंतरावर गेले असता कालिंका माता चौकात मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये योजस बऱ्हाटे डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. तर बहीण भक्ती व मामा योगेश बेंडाळे किरकोळ जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या डोळ्यादेखत डंपर चालकाने अनियंत्रित वेगाने येऊन दुचाकीला धडक दिली अन् क्षणार्धात चिमुरड्याच्या डोक्यावरून चाक गेल्याचे सांगितले.
जमावाने पेटविला डंपर..
अपघातानंतर नागरिकांनी जखमींना रुग्णालयात नेताच काही कळायच्या आत संतप्त जमावाकडून डंपर पेटवण्यात आला. तसेच संतप्त जमावाने डंपरला पेटवून देत महामार्ग रोखून धरला. घटनेनंतर चालक डंपर तसाच सोडून पळ काढल्याने तो बचावला. घटना कळल्यानंतर जुने जळगाव, जुने नशिराबाद रोड, आयोध्यानगर, कालिंका माता परिसरातून दोन ते तीन हजारांच्या जमावाने महामार्गावर दोन तास ठिय्या मांडून चालकाला आमच्या समोर आणण्याची मागणी केली. तर जमावाला पांगविण्यासाठी राखीव कमांडो फोर्सने लाठीचार्ज करताच चारही बाजूंनी जमावाने दगड व विटा भिरकावल्याने चांगलीच धावपळ झाली.