पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या हटवादीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली असून आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयाने 10 लाखांची मागणी करत उपचार नाकारल्याप्रकरणी हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी आता पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.या समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष डॉ. राधाकिशन पवार ( उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडल) असणार असून डॉ. प्रशांत वाडीकर (सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ), डॉ. नागनाथ यम्पल्ले (जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध), डॉ. निना बोराडे ( मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका) डॉ. कल्पना कांबळे (वैद्यद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ज्ञ) हे सदस्य असणार आहेत. ही समिती रुग्णालयाला भेट देऊन सविस्तर अहवाल सरकारला सादर करणार आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. प्रसूतीच्या काळात सुरू झालेल्या तनिषा सुशांत भिसे या महिलेला दाखल करण्यासाठी आणल असता रुग्णालयाने दहा लाख रुपयाची मागणी केली. कुटुंबीय अडीच लाख रुपये देण्यास तयार असतानाही प्रशासनाने दाखल करून घेण्यास नकार दिला दरम्यान दुसऱ्या रुग्णालयात हालवताना तनिषाला त्रास वाढला आणि जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून देखील रुग्णालयात चौकशी करण्यात येणार असून रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत.