नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून ३० वर्षीय युवकाचा लाठ्या, काठ्यांनी, कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सिटीसेंटर मॉलपासून जवळच संभाजीनगर परिसरातील क्रांतिनगर झोपडपट्टीत साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नितीन शंकर शेट्टी असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामावरून आल्यावर नितीन याने जेवण केले. तसेच सायंकाळी पाच वाजता तो त्याच्या घरात झोपला होता. तेव्हा त्याचा लहान मुलगा घराबाहेर अंगणात खेळत होता. त्यावेळी दोन दुचाकीवर त्याठिकाणी चार ते पाचजण आले. त्यातील दोघांनी नितीन यास झोपेतून उठवले. तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे असे सांगून घरा बाहेर बोलविले.
दरम्यान, नितीन घराबाहेर पडताच दबा धरून बसलेल्या इतर तिघांनी मिळून नितीनवर कोयत्याने सपासप वार केले. चेहरा, मान, पाठ व हातावर वार केल्याने नितीन त्या तिघांना प्रतिकार करू शकला नाही. हल्लेखोरांनी नितीनच्या उजव्या डोळ्यावरही गंभीर स्वरूपाचे वार केले. त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला. तर मानेची नस देखील कापली गेल्याने त्याचा जीव गेला. चेहऱ्यावरही खोलवर गंभीर जखमा झाल्या होत्या.
नितीनच्या दोन्ही हातांच्या मनगटावरही जखमा आढळून आल्या. मोठा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने नितीन गतप्राण झाला. त्याच्या भावासह शेजारच्या काही व्यक्तींनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपींनी नितीनवर वार करून घटनास्थळावरून फरार झाले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.