पुणे : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील रस्ता आज मध्यरात्री १२.३० ते १.०० या कालावधीत अर्धा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सर्विस रोडचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये सुरूंग लावण्यात येणार आहे. त्यामुळे चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चांदणी चौक येथील पूल २ ऑक्टोबर रोजी स्फोटकांद्वारे पाडण्यात आला आणि महामार्गावरील राडा-रोडा उचलून चांदणी चौक येथील दोन्ही बाजूस जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. त्यानंतर आता सर्विस रोडचे काम सुरू आहे. या कामासाठी रविवारी दुपारी १० मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबई-सातारा मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
चांदणी चौक येथे खडक फोडण्यासाठी सुरुंग लावण्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘एनएचएआय’ने ३ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजताच्या सुमारास रस्ता २० मिनिटे वाहतुकीसाठी बंद केला होता. त्याचा फटका हजारो वाहनचालकांना बसला. त्यानंतर जवळपास संपूर्ण दिवसभर या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. त्यात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची वाहने कोंडीत अडकल्याने पालक हवालदिल झाले होते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री करण्यात येणाऱ्या वाहतूक बंदीबाबत प्रशासनाकडून नागरिकांना कल्पना देण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी व शासनास सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.