लहू चव्हाण
पाचगणी : भिलार परिसरात शेतकऱ्यांनी अतोनात खर्च करून कष्टाने जगवलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात असून रानगव्यांच्या हैदोसाने स्ट्रॉबेरीसह अन्य पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा कायम बंदोबस्त करावा अशी महाबळेश्वर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.
भिलार (ता.महाबळेश्वर) येथील कनगझरा परिसरात गेली दोन दिवसांत रानगव्यांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून स्ट्रॉबेरी, गहू यासह अन्य पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या पावसाच्या अनिश्चिततेने आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत असताना असताना या वन्य प्राण्यांच्या संकटाने शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे.
प्रचंड महागाईने शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. महागाईची बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी त्यातून आर्थिक उत्पन्नाची आशा ठेवली असताना या वन्य प्राण्यांच्या संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. परिसरात रानगव्यासह रानडुकर व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकुळ सुरू आहे. बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहे. मात्र, वन्यप्राणी नासाडी करतात त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. वन्यप्राण्यांकडून भिलार येथील शेतकरी गणेश शंकर भिलारे, बाजीराव धोंडिबा भिलारे, सदाशिव सखाराम भिलारे, संजय श्रीपती भिलारे,प्रकाश बापू गावडे, पांडुरंग तात्याबा मोरे यांसह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकर्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.