दातांमध्ये समस्या निर्माण होणे ही अगदी सामान्य बाब झाली आहे. फक्त वयोवृद्धांनाच नाहीतर आता सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अनेक आवडत्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे कठीण होते. आईस्क्रीम आवडत असेल किंवा गरम चहा प्यायचा असेल तर खूप त्रास होतो. पण, आता दातांच्या सेन्सिटिव्हिटीची कारणे समोर आली आहेत.
दातांमधील सेन्सिटिव्हीटी अनेक कारणांमुळे होऊ शकते. त्यात आपल्या दातांच्या आरोग्यासाठी निरोगी हिरड्या खूप महत्त्वाच्या असतात आणि वाढत्या वयामुळे आणि चुकीच्या आहारामुळे हिरड्यांची पकड सैल होऊ लागते. यामुळे डेंटाइनचे एक्सपोजर वाढते, ज्यामुळे समस्या निर्माण होते. आपल्या दातांवर एक चमकदार संरक्षणात्मक थर असतो, ज्याला इनॅमल म्हणतात. जर काही कारणास्तव थर झिजला किंवा संपला, तर थंड आणि गरम पदार्थांच्या संपर्कात आल्यावर समस्या निर्माण होऊ शकतात.
चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे हेदेखील कारण ठरू शकते. अनेकवेळा दात अधिक चमकण्याच्या प्रयत्नात आपण दात घासायला सुरुवात करतो, पण त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. दात स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रिस्टल्स असलेला ब्रश वापरावा आणि तो दातांवर हलक्या हाताने घासला पाहिजे. त्याने दातांचे आरोग्य निरोगी राहू शकते.