लोणी काळभोर : हवेली तालुक्यात सामाईकात ग्रुपमध्ये अकरा गुंठे क्षेत्र खरेदी करताय? त्या सामाईकातील व्यवहारातील प्रत्येकाची स्वतंत्र नोंद, स्वतंत्र खाते नंबर व स्वतंत्र क्षेत्र सातबारावर नोंद करायची आहे. मग चिंता सोडा. हो! हा प्रकार 100 नव्हे 101 टक्के खरा आहे. तो हवेली तालुक्यातच घडला असून याबाबतचे पुरावे “पुणे प्राईम न्यूज” च्या हाती लागले आहेत. तर मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत मात्र ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली- क्रमांक 7,वाघोली व महसूल विभागाने हा चमत्कार केला आहे. मात्र, हा चमत्कार खास लक्ष मोलाच्या प्रोटोकॉलसाठी केला असल्याचे उघड झाले आहे. कारण हा चमत्कार खास लोकांसाठी असून सर्वसामान्यांसाठी याचा लाभ नसल्याचे दुय्यम निबंधक कार्यालय व महसूल विभागाच्या कारभारावरुन उघड होत आहे.
फुरसुंगी (ता. हवेली) येथील सर्व्हे नंबर १२७/१३ मध्ये हा पराक्रम दुय्यम निबंधक कार्यालय व महसूल विभागातील तलाठी व मंडल अधिकाऱ्याने दस्त क्रमांक १५७९० आणि फेरफार क्रमांक ४८७१७ अन्वये यशस्वी केला आहे. एकाच फेरफार क्रमांकात एकाच खरेदी दस्तावेजातील तब्बल १० खाते नबंर करुन सातबारा आणेवारीसहीत, संपूर्ण क्षेत्रासह तंतोतंत जुळवला आहे. विशेष म्हणजे परराज्यातील शेतकरी नसलेल्या काही व्यक्तींनी फुरसुंगीतील या सामाईक खरेदीखतात लाभ घेतल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी हवेलीचे प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने व हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन न घेतल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
खास व्यक्तींना वेगळा नियम, प्रशासनाची अजब नियमावली
याबाबत शासनाचा कोणताही नवीन नियम अथवा जीआर नाही, मात्र तरीही हा प्रशासनाने केलेला अजब कारभार हवेली तालुक्यात उघडकीस आला आहे. यावरून प्रशासन एकीकडे खास व्यक्तींसाठी नियमबाह्यपणे पायघड्या टाकत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांसाठी काटेरी नियमांवर बोट ठेवत असल्याचे समोर आले आहे.
प्रोटोकॉलच्या ताकदीने शासकीय नियमांना वाकवण्यात अधिकारी माहीर
विशेष प्रोटोकॉल करणाऱ्या व्यक्तींसाठी अगदी सामाईक ग्रुपमध्ये अकरा गुंठे क्षेत्र खरेदी केल्यास, सातबारावर प्रत्येकांची स्वतंत्र हिस्सेदारी नमूद होते. खरेदी ग्रुपमध्ये अगदी अर्धा गुंठा हिस्सा असला, तरी सातबारावर मालक सदरी तुमची स्वतंत्र नोंद, खाते नंबर व क्षेत्र सातबारावर येते. ही किमया प्रोटोकॉलच्या ताकदीवर होत आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी शासकीय नियमांना वाकवण्यात माहीर बनले आहेत.
सर्वांचीच मिलीभगत; कारवाई सोडा, साधी चौकशीही होणार नाही
प्रशासनातील कर्मचारी हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रोटोकॉलच्या माध्यमातून जोडले जात असल्याने त्यांच्या हितसंबंधाची सर्वदूर चर्चा होत असते. नियमबाह्य कामकाजातून मिळणारा मलिदा कर्मचारी इमाने इतबारे आपल्या वरिष्ठापर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे नियमबाह्य केलेल्या कामकाजाची चौकशी करणे अथवा कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकारी धजावत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना सहाय्यक जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे म्हणाले की, १० व २० गुंठ्यांच्या सामाईक क्षेत्राची खरेदीखते करता येतात. मात्र त्यामध्ये आणेवारी लावली जात नाही किंवा आणेवारी लावण्याचा कुठलाही नियम नाही. याबाबतचा तक्रार अर्ज करा. त्याची चौकशी करून योग्य कारवाई करतो.