पुणे : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४४ लाख २४ हजार ५१६ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ३७ लाख ९१ हजार ८९९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ८.५५ टक्के एवढा आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमुळे चालू वर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उशिराने सुरू झाला आहे. १५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली असली तरी हळहळू साखर कारखाने सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. यंदा जिह्यात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला होता. त्यातच विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या.
शासनाने १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्यागतीने सुरू झाला. चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र, ऊस शेतात जुलैपासून पाणी राहिल्याने ऊसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे.
पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर ऊसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. यंदा गाळपासाठी सुमारे एक लाखाच्या आसपास ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यात जवळपास १६ साखर कारखाने असून गाळपासाठी सर्वच कारखाने पुढाकार घेतली अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये सहकारी ९ आणि खासगी ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख १७ हजार टन एवढी आहे, आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे.