दीपक खिलारे
इंदापूर : राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शेती महामंडळाकडून देण्यात आलेल्या सुमारे 37 हजार एकर जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 चा शेरा हा भोगवटदार वर्ग 1 करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटने घेतलेला निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. या मागणी संदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या. आता या निर्णयामुळे खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यांनी बुधवारी (दि.29) दिली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील वर्ग 2 चा शेरा आता वर्ग 1 करण्याचा निर्णय झाल्याने राज्यातील शेती महामंडळाच्या 7 जिल्ह्यांमधील 13 मळ्यावरील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर कर्ज घेणे, खरेदी विक्रीचे व्यवहार आदी सर्व मालकी हक्क प्राप्त झाले आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्यातील सुमारे 2500 हजार एकर जमीन धारक असलेल्या सुमारे 500 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणे हा अतिशय अवघड प्रश्न होता. प्रारंभीच्या काळात ज्येष्ठ नेते कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी शेती महामंडळाकडील खंडकरी शेतकऱ्यांचा जमिनीचा प्रश्न सोडविण्यामध्ये लक्ष घालून अनेक शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून दिल्या. त्यानंतर मी राज्य मंत्रिमंडळात असल्याने सलग 20 वर्षे सतत पाठपुरावा करून, अनेक अडचणींवर कायदेशीर मार्ग काढत वर्षानुवर्षे पाठपुरावा करून सर्व अडचणी दूर करून फक्त 1 रुपये नाममात्र दराने खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत देण्यात आल्या, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीवर भोगवटदार वर्ग 2 हा शेरा असल्याने खंडकरी शेतकऱ्यांना कर्ज मिळणे व इतर अडचणी येत होत्या. या संदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आम्ही सतत बैठका घेतल्या व राज्य मंत्रिमंडळाने भोगवटदार वर्ग 1 करण्यासाठी महसूल अधिनियमात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री या सर्वांचे आभार व्यक्त केले.
महायुती सरकारकडून खंडकरी शेतकऱ्यांना ही मोठी भेट आहे. हा निर्णय खंडकरी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दूरगामी परिणाम करणारा अतिशय चांगला निर्णय असल्याचे गौरोद्गारही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
हर्षवर्धन पाटील यांचे उपकार खंडकरी शेतकरी विसरणार नाही : बी.डी. आण्णा पाटील
खंडगिरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सतत 20 वर्षे खूप मोलाची खूप मदत केली. राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर आदी 7 जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या मुंबईतील बंगल्यावर, मंत्रालयातील त्यांच्या केबिनमध्ये वर्षानुवर्षें राबता असायचा. हर्षवर्धन पाटील हे अभ्यासू मंत्री, नेते आहेत. खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळण्यामागे हर्षवर्धन पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे उपकार खंडकरी शेतकरी कधीही विसरणार नाही, असे महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. डी. आण्णा पाटील यांनी या निर्णयानंतर बुधवारी सांगितले.