इंदापूर : राज्यात पुन्हा जनतेचे, रयतेचे राज्य आणण्यासाठी तसेच तालुक्यातील मलिदा गँग, गुंडशाही हद्दपार करण्यासाठी परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभेतील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले. आज (दि.24) हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर विधानसभेसाठी अर्ज भरला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर सडकून टीका केली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, 2009 मध्ये माझ्या विरोधात बंडं केल्यानंतर सहा वर्षांसाठी पक्षातून तुम्हाला बडतर्फ केलं, पण दोन वर्षात परत आला. आमदार कोणी केलं, मंत्री कोणी केलं पण पवार साहेबांना तुम्ही दगा दिला, अशा शब्दांत पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला. तसेच आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, पण कोणी साड्या वाटल्या का? असा सवाल त्यांनी भरणे यांना करुन मलिदा गँग, इंदापूर बचाओ असा कार्यकर्त्यांचा नारा असल्याचा टोला लगावला.
उजनी धरणावर पूल करा अशी कोणाची मागणी होती का? असा सवाल करत ते चारशे कोटी उजनीच्या बुडीत बंधार-यासाठी खर्च केले असते, तर चार हजार कोटींच उत्पन्न या शेतक-याने घेतले असते. असेही पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, उद्याच्या विधानसभेतील निवडणूक किती रंगीत आहे माहित नाही, पण तुतारीमय असून तुतारी महाराष्ट्राच्या विधानभवनात वाजणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशासन चालवण्यासाठी चांगली माणसं लागतात. म्हणून पवार साहेबांनी माझा विचार केला असेल असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापूरचा बिहार होऊ देणार नाही..
एका पत्रकाराने महिलांनी फेकून दिलेल्या साड्या म्हणून बातमी लावली म्हणून त्याला धमकी दिली. त्या धमकी देणारा मागे कोण आहे? त्या धमकी देणाऱ्याचा जाहीर निषेध असून एवढी मस्ती आणि दादागिरी तुमच्यात का आली? ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. इंदापूरचा बिहार होऊ द्यायचा नसेल, तर तर तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबा. ग्रामपंचायतीपेक्षा अधिक ताकदीने काम करा. चोवीस दिवस जीवाचं रान करा, पुढील पाच वर्ष तुमची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांची आहे.