इंदापूर: माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर इंदापूर येथील त्यांच्या भाग्यश्री निवासस्थानी फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या घोषणा देखील देण्यात आल्या. हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेतला, असं कार्यकर्त्यांच्या देहबोलीवरून जाणवत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विचारधारेशी एकनिष्ठ पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये ‘आम्ही साहेबांसोबतच’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. ३) शरद पवारांची भेट घेतली असून उद्या पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करणार आहेत. तर दुसरीकडे त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.
आगामी चार दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार 6 किंवा 7 तारखेला पाटील हे हातात तुतारी घेणार असून भाजपने देखील त्यांच्या या दाव्यावर स्पष्टपणे भूमिका मांडली. राजकारणात प्रत्येकाला महत्वकांक्षा असतात, हर्षवर्धन पाटील यांचं काही चुकीचं सुरू आहे, असं मी म्हणणार नाही. पण माझं म्हणणं आहे की, कोणीही एक पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं, असे म्हणत एकप्रकारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.