पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विकृत वक्तव्ये केली जात आहेत. चित्रपट व विविध माध्यमातून चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे. हे विकृतीकरण थांबले नाही तर तर लहान मुलासमोर असाच तोडका – मोडका इतिहास येणार आहे. त्यांना सत्य परिस्थिती कधीच समजणार नाही.
ही परिस्थिती टाळायची असेल तर या विरोधात आवाज उठवणे ही सर्वाची जबाबदारी आहे, असे आवाहन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतली. येथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छत्रपती शिवरायांनी लोकशाहीचा ढाचा निर्माण केला. देशातील युगपुरूष आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहासारखी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी महाराजांची प्रतिमा मलिन केली जात असल्याबाबत खंत व्यक्त केली. राजकीय स्वार्थासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहेत.
परंतु, त्यांच्याबाबत गलिच्छ कोणी बोलले तर त्यांच्यावर कारवाई होत नाही, याबाबत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला.