पुणे : ट्रकने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा हात तुटला. हा तुटलेला हात पुन्हा जोडण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांनी रुग्णाला घरी देखील सोडण्यात आले.
विशाल (नाव बदलले आहे) यांचा दुचाकीवरून जात असताना दिवे घाटात ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा उजव्या बाजूचा हाताचा वरचा भाग कापला गेला. त्यानंतर त्यांना हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. तिथे डॉ. सुमित सक्सेना यांनी त्वरित त्यांच्यावर योग्य उपचार करणे सुरु केले.
डॉक्टरांनी अतिशय दुर्मीळ व गुंतागुंतीची हस्तप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया विशाल यांच्यावर यशस्वीपणे केली. या सहा तासांच्या अवघड शस्त्रक्रियेमध्ये डॉ. सक्सेना आणि त्यांच्या पथकाने तुटलेला हात पुन्हा जोडण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले. विशाल यांना यशस्वी शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून ते पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. अद्यापही आणखी काही हाडे तुटलेली असल्याने अजूनही ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ. सुमित सक्सेना म्हणाले की, शरीरातील रक्तवाहिन्या, नसा, स्नायू, स्नायूबंध आणि हाडे यांच्यासह सर्व महत्त्वाच्या संरचना सहा तासांच्या आत ठीक करण्यात आल्या आहेत. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होती. ही शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीची होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात विच्छेदन करावे लागणार असल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता. शस्त्रक्रियेनंतरही रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते.