भोर : कपड्यांची वाहतूक करत असल्याची बतावणी करून पानमसाला व सुगंधी तंबाखू मालाची वाहतूक करताना ट्रकसह २० लाख ४५ हजार रुपये किमतीचा गुटखा राजगड पोलिसांनी जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील कामथडी येथे शनिवारी (दि. २९) दुपारच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत १० लाखाचा ट्रक, २१ पोती पानमसाला गुटखा असा एकूण ९ लाख ४५ हजार किमतीचा गुटखा असा एकूण २० लाख ४५ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. इस्माईल गौसुद्दीन कुसनुर (वय ३३, रा. उल्हासनगर, ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्या चालकाचे नाव आहे. हा गुटखा कर्नाटक (निपाणी) मधून ठाणे उल्हासनगरला जात असल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक अजित पाटील, पोलिस जवान अक्षय नलावडे, मंगेश कुंभार यांनी कामथडी येथे महामार्गावर सापळा रचला. या वेळी सातारा बाजूकडून येणाऱ्या आयशरचालक इस्माईल याला विचारणा केली असता त्याने कपडे वाहतूक करत असल्याचे सांगितले.
पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये काळ्या रंगाच्या ताडपत्रीने झाकलेल्या खाली पानमसाला, तंबाखूजन्य गुटखा मिळून आला. मात्र, हा माल कोणाकडून आणला व कोणाला दिला जाणार होता, याबाबत पोलिसांचा तपास सुरू असल्याचे उपनिरीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.