नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे वेध लागले आहेत. अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होईल, अशा आशयाचे बॅनर देखील लागले आहेत. तर, कार्यकर्त्यांनी, मित्रांनी पैजा लावत आपला आत्मविश्वास व्यक्त केला आहे. यंदा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे निकालानंतर मोठा जल्लोष करायचा आणि मिरवणूक काढायची याचं नियोजन सर्वच मतदारसंघात सुरू आहे. मात्र नाशिक मध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
नाशिक शहरातील प्रत्येक उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी, मोठ्या प्रमाणात फौजफाटा नाशिक शहरात दाखल झाला आहे. शहरात विविध ठिकाणच्या चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे. नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि इगतपुरी या चार मतदारसंघाची मतमोजणी शहरातील विविध ठिकाणी होणार आहे. त्यामुळे, शहरात वरिष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षकांसह हजारो पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
या सदर्भात पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी, शहरात उद्या निवडणूक निकालानंतर रॅली किंवा मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, राज्यातील 288 मतदारसंघातील निवडणुकांसाठी उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.