नवी दिल्ली: सिनेमागृहांमध्ये खुलेआम विकल्या जाणाऱ्या पॉपकॉर्नवर रेस्टॉरंट्स प्रमाणेच पाच टक्के दराने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यात येणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जर चित्रपटाच्या तिकिटासह पॉपकॉर्नची विक्री झाली, तर ते संमिश्र पुरवठा मानले जाईल. या प्रकरणात मुख्य पुरवठा तिकीट असल्याने त्यावर लागू दरानुसार कर आकारला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
जीएसटी परिषदेच्या ५५ व्या बैठकीत पॉपकॉर्नवरील जीएसटीचे स्पष्टीकरण करण्यात आले. खरे तर, उत्तर प्रदेशातून मीठ आणि मसाल्यांच्या पॉपकॉर्नवर लागू होणारे वर्गीकरण आणि जीएसटी दर स्पष्ट करण्याची विनंती प्राप्त झाली होती. पॉपकॉर्नवरील जीएसटी दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमागृहांमध्ये पॉपकॉर्न लूज स्वरूपात विकले जाते आणि त्यामुळे ‘रेस्टॉरंट सर्व्हिस’ प्रमाणेच पाच टक्के दर लागू राहतील, तथापि, यासाठी पॉपकॉर्नचा स्वतंत्र पुरवठा आवश्यक असेल.
जीएसटीअंतर्गत मीठ आणि मसाले असलेले पॉपकॉर्न नमकीन म्हणून वर्गीकृत केले आहे आणि त्यावर पाच टक्के कर आकारला जातो. जेव्हा ते प्री-पॅकेज आणि लेबल केलेले विकले जाते, तेव्हा दर १२ टक्के असतो. काही वस्तू वगळता सर्व साखर मिठाईवर १८ टक्के जीएसटी लागू होतो आणि त्यामुळे कॅरामलाइज्ड साखर असलेले पॉपकॉर्न १८ टक्के जीएसटीच्या अधीन आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, कौन्सिलने मीठ आणि मसाले असलेल्या पॉपकॉर्नवरील वर्गीकरण विवाद सोडवण्यासाठी स्पष्टीकरण जारी करण्याची शिफारस केली आहे.