लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील क्रेयॉन्स प्रीस्कूल लोणी काळभोर या शिक्षण संस्थेतर्फे
“आजी-आजोबा मेळावा” उत्साहात पार पडल्याची माहिती स्कूलचे प्रमुख कमलेश दत्तात्रय काळभोर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन क्रेयॉन्स प्रीस्कूलच्या संचालिका सोनाली मोरे, श्वेता काळभोर, पल्लवी तांदळे, व मुख्याध्यापिका हृषदा बारवकर यांच्यासह त्यांच्या शाळेतील शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी केले होते.
आजी-आजोबांपासून ते नातवंडापर्यंत असलेले उबदार नाते तीन पिढय़ांच्या घट्ट बंधनात घर टिकवून असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात विशेषत: आई-बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे आजी-आजोबा यांच्यावर नातवंडांची अधिक जबाबदारी आहे. परंतु आजकाल अनेक कुटुंब नोकरीनिमित्त परगावी आलेले असल्यामुळे आजी आजोबांचा सहवास नातवंडांना क्वचितच मिळतो. फक्त गावी गेल्यानंतरच आजी आजोबांचा सहवास या लहान चिमुरड्यांना लाभतो. “इंटरनॅशनल ग्रँड पॅरेन्ट्स डे” च्या निमित्ताने या नात्याला एकत्रित आणण्यासाठी व आजी आजोबांचे नातवंडाबरोबरचे नाते अधिक वृद्धंगीत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे काळभोर यांनी संगितले.
कार्यक्रमाची सुरुवातीला प्रवेशद्वारावर आजी-आजोबांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. आजी आजोबा हे तुमच्यावर तुमच्या पालकांपेक्षा जास्त प्रेम करत नाहीत तर तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाचे धडे देखील शिकवत असतात. तरुण आजी-आजोबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. म्युझिकल चेअर, पिक्शनरी, डोळ्यावर पट्टी बांधणे यासह इतर अनेक असे खेळ खेळण्याचा आनंद लुटला.
आजी-आजोबांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे जीवन अनुभव सांगण्यासाठी एक व्यासपीठाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. यावेळी कदमवाकवस्तीचे उपसरपंच बाबासाहेब काळभोर, साधना सहकारी बँकेच्या संचालिका वंदना काळभोर आदी अनेक मान्यवर “आजी आजोबा” म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.
दरम्यान, आमच्या मुलांच्या शाळेनंतर आम्ही आज प्रथमच शाळेत आलो आहोत असे एका आजीने सांगितले. त्याचबरोबर वारंवार अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत जा अशी विनंतीही काही आजी-आजोबांनी केली. याप्रसंगी आनंदी व भावूक असे संमिश्र वातावरण तयार झाले होते.