पुणे : गावोगावच्या ग्रामसेवकांनी दैनंदिन अहवाल प्रशासनाला देणे बंद केले आहे. कुठल्याही बैठकीला ग्रामसेवक उपस्थिती लावत नाहीत. मात्र, गावकऱ्यांची अडवणूक करणार नसल्याची भूमिका घेत जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन तोडगा न निघाल्याने सुरूच ठेवले आहे. सोमवार (दि.२३) पासून हे असहकार आंदोलन सुरू असून, जिल्ह्यात एक हजार चार ग्रामसेवक आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनासमवेत बैठक झाली. परंतु, या बैठकीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामपंचायत अधिकारी युनियनकडून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दैनंदिन विविध योजनांचे अहवाल जिल्हा परिषदेला मिळणे बंद झाले आहे.
परिणामी, विविध योजनांचा आढावा गावपातळीवर मिळणे बंद झाले आहे. ग्रामसेवकांची आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभाची सुमारे साडेतीनशे प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. शिवाय, कपात केलेली रक्कमदेखील जमा झालेली नाही, यासह इतरही मागण्या ग्रामसेवकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.