उरुळी कांचन, (पुणे) : ग्रामस्थ, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकमेकांच्या समन्वयातून गावामध्ये योजना आखण्यात आलेल्या आहेत. त्या राबवण्याचे मुख्य व्यासपीठ म्हणजेच ग्रामपंचायत आहे. मात्र योजनेचा लाभ घेताना जागरूकता बाळगणे व स्वयंप्रेरीत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यशदाचे मास्टर ट्रेनर व ग्रामविकासावर ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षित करणारे अनुभवी व्याख्याते जालिंदर काकडे यांनी व्यक्त केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. मणीभाई देसाई सभागृह या ठिकाणी २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यातील नऊ संकल्पना पैकी आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, स्वच्छ आणि हरित गाव या तीन संकल्पनांच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी करण्यात आलेल्या संकल्पाच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काकडे बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच राजेंद्र बबन कांचन होते. माजी सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन, माजी उपसरपंच संचिता संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन शंकर बडेकर, सीमा दत्तात्रय कांचन, अनिता भाऊसाहेब तुपे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर यांचे सह महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना काकडे म्हणाले,” शासनाने अनेक विविध योजना जनतेच्या हितासाठी तयार केलेल्या आहेत, त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केलेली आहे, सर्व थरातील महिला, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी यांचा विचार करून या योजना आखण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छता अभियानाच्या प्रसारासाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली होती. तसेच तांबे वस्ती व गोळे वस्तीवर ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या सहकार्याने वृक्ष लागवड करण्यात आली.