अक्षय टेमगिरे
शिरूर : शिरुर येथील रामलिंग ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असताना ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश माणिक कु-हाडे (वय ४१ )यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा निषेध करत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले होते. मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिल्यावर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, २ एप्रिलला दुपारी दोनच्या सुमारास श्रीनिवास सोसायटी, रामलिंग रोड ता. शिरुर, जि. पुणे येथे ग्रामपंचायत शिरुर ग्रामीणचे पाणी पुरवठा विभागाचे अंकुश कु-हाडे हे नळ पाणी पुरवठ्याच्या कामासाठी जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदण्याचे शासकीय काम करीत असताना अमित जयंत डोंगरे (रा. श्रीनिवास सोसायटी, रामलिंग रोड ता. शिरुर जि. पुणे )याने त्याचे घराच्या पार्कीग समोरील पाईपचे का काम केले नाही म्हणुन कु-हाडे व जेसीबी सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे( रा. देवदैठण ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर )यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. तसेच कु-हाडे यांच्या कंबरेत, मानेवर दगडाने मारहाण करुन दुखापत केली तसेच सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे यास हाताने डोक्यात, पाठीत मारहाण करुन त्याला सोसायटीतील प्रत्येक घरासमोर उठाबश्या मारण्यास लावले. तसेच मोटर सायकलला (क्र. एम. एच. १२ सी. झेड. ९६२३ ) दगडाने ठेचुन नुकसान केले. दरम्यान शासकिय कामास अडथळा केला म्हणून डोंगरे यांच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात कु-हाडे यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान शिरुर रामलिंग ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातील अंकुश कु-हाडे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करुन ग्रामपंचायतीच्या ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेल्याचा विरोधात कारवाई करण्याची मागणी करीत आज ( ३ एप्रिल )पासुन काम बंद आंदोलन सुरु केले होते .
या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी यासाठी शिरुर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड, उपसरपंच बाबाजी वर्षे व माजी सरपंच अरुण घावटे, विठ्ठल घावटे, माजी उपसरपंच भरत बो-हाडे व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली .यावेळी रामलिंग रोड कॉलनीतील स्थानिक महिलाही ही उपस्थित होत्या.
पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी संबधिंतावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असुन. या आश्वसनानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे .