Gram Panchayat Election Voting : लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, निरगुडसर, पारगाव, पोंदेवाडी, लोणी, पहाडदरा, मांदळेवाडी आदी गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. थेट सरपंच निवड असल्यामुळे अवसरी, निरगुडसर, पारगाव, पोंदेवाडी, लोणी, मांदळेवाडी या गावांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कन्या पूर्वा वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
तरुणांचा राजकारणात येण्याचा कल अधिक आहे. सुशिक्षित तरुणांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेत हिरिरीने सहभाग नोंदविला आहे. बहुतांश गावांत तरुणांनी जुन्या जाणत्यांसमोर आव्हाने उभी केली. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे प्राबल्य पाहायला मिळत आहे. निवडणुकीत थेट पक्षाचे निवडणूक चिन्ह नसले तरी गावपातळीवरील नेत्यांनी आपले पॅनेल उभे करून प्रत्यक्षपणे प्रचारात सहभाग घेतला. पारगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, निवडणूक छोटी असो वा मोठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवरील असते. गावातील विविध प्रश्न, समस्या मार्गी लावण्याचे काम ग्रामपंचायत करत असून, गावातील प्रत्येक मतदाराने गावचा विकास करण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे.
– दिलीप वळसे-पाटील, सहकार मंत्री