नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावं लागत आहे. कित्येक तास एकाच जागेवर गाडीमध्ये बसून राहावं लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची दखल आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. दादा भुसे यांनी या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली असून येत्या 10 दिवसांत महामार्गावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल संदर्भात आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मोठं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं आहे.
दादा भुसे यांनी NHAI आणि उद्योजकांच्या बैठकीत याबाबतचं वक्तव्य केलं. त्यामुळे 10 दिवसात खड्डे दुरुस्त न झाल्यास आता महामार्गावरील टोल बंद केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांच्या संदर्भात नाशिक शहरातील उद्योजक आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यात आज संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला NHAI चे अधिकारी, हायवे पोलीस देखील उपस्थित होते. उद्योजकांनी 31 तारखेपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुदत दिली होती. महामार्गावरील खड्डे अद्याप ही जैसे थेच असल्याने उद्योजकांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. पालकमंत्री नेमके काय आदेश देतात याकडे देखील सर्वांचे लक्ष होतं. अखेर या बैठकीत पालकमंत्र्यांनी मोठा इशारा दिला आहे. खड्डे दुरुस्त न झाल्यामुळे आता आगामी काळात टोल बंद होण्याची शक्यता आहे.
दादा भुसे आक्रमक..
पालकमंत्री दादा भुसे यांनी या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, “नाशिक-मुंबई प्रवासाला जास्त वेळ लागतोय हे खरं आहे. मागच्या आठ-दहा दिवसांपूर्वी मी स्वतः ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. भिवंडीला आपण बारा लेनचा रस्ता करतोय. या भागातील महामार्गावरील ४४ कट आम्ही ३-४ वर आणले आहेत. JNPT वरील माल भिवंडीला मोठ्या प्रमाणात गोडाऊन आहेत, तिथे जातात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय. त्यामुळे भिवंडी इथे २० किलोमीटर महामार्ग १२ लेन करतोय. जड वाहनांना महामार्गावर रात्री आणि दिवसा वेळ ठरवून दिली जाईल. लहान वाहनांना महामार्गावरील १-२ लेन राखून ठेवणार”, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.