पुणे : प्रभु श्रीराम तसेच रामभक्त हनुमान यांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ, पुणे यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही अनोख्या गौ-अन्नकोट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गोमातेचे, पशुखाद्याचे पूजन करून पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सुमारे ५१ गोशाळांना प्रत्येकी ५५० किलो पशुखाद्याचे वाटप करण्यात आले.
सरकी पेंड, एच. पी. गोळी, भुस्सा, तूर चुनी, मका चुनी, चना कोळ, हिरवा चारा, गुळ, मीठ, हिरवा चारा आदी खाद्याचा यात समावेश आहे. माहेशवरी समाजातील बांधवांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो.
गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील गोयल गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी, प्रसिद्ध उद्योजक मगराज राठी, अन्नकोटाचे प्रमुख यजमान उद्योगपती शामसुंदर कलंत्री, यजमान जुगल मालू, पुष्पा कासट व बंकटलाल मुंदडा आदी पाहुण्यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले.
त्यानंतर पशुखाद्य मांडलेल्या अन्नकोटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर गोशाळांच्या प्रतिनिधींना बोलावून प्रातिनिधिक स्वरूपात पशुखाद्य वितरित करण्यात आले.
यावेळी महेश सहकारी बँकेचे सोमेश्वर करवा, विष्णु चमाडिया, नरेश जालान, पुनमचंद धूत, सचिन नहार, अयोध्या सारडा, पवनकुमार सोनी, नीता बिहानी, गणेश भुतडा, या मान्यवरांनी या गौ-अन्नकोटचे यजमान पद भूषविले.
पुण्यातील प्रसिध्द युवा भजनगायक निलेश सारडा, कन्हैया आगीवाल, राजेंद्र भन्साळी, गोकुळ डाळ्या, घनश्याम भट्टड, उमेश करवा, पुरुषोत्तम सिंगी, योगेश मुंदडा यांच्या सुरेल आवाजातील भजनसंध्येने वातावरण भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमात माहेशवरी तसेच अन्य विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाचे वितरण करून झाली.
सामाजिक काम करण्याची इच्छा मनात असल्यास आपण कोणत्याही माध्यमातून करू शकतो, याचा आदर्श श्री सालासर हनुमान चालीसा मंडळाने समाजापुढे घालून दिला आहे, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.