सोलापूर – पुणे-सोलापुर इंद्रायणी एक्स्प्रेससह ८ रेल्वेगाड्या आज शुक्रवार (ता.१९) पासून सुरु झाल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवास्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे-सोलापूर लोहमार्गावरील भिगवण, जिंती, पारेवाडी आणि वाशिंबे या रेल्वे स्थानकादरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम करायचे होते. या कामासाठी सोमवार २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान इंद्रायणी एक्स्प्रेससह ८ रेल्वेगाड्या २५ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग वळविण्यात आले होते. मात्र भिगवण ते वाशिंबे दरम्यानचे काम पूर्ण झाल्यामुळे आज शुक्रवारपासून रेल्वेगाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
सुरु झालेल्या रेल्वे गाड्या
सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू, भुनेश्वर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस, चेन्नई-साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्स्प्रेस, अहमदाबाद-यशवंतपुर साप्ताहिक एक्स्प्रेस, दादर-पंढरपूर त्रीसाप्ताहिक एक्स्प्रेस या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्रमांक १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन सुटणारी गाडी पुणे, दौंड, कुर्डूवाडी, वाडी या मार्गाने पुणे, मिरज, कुर्डूवाडी, वाडी मार्गे वळविण्यात आली होती. ती गाडी पुन्हा पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावरून सुरु करण्यात आली आहे.