पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका, अशा सुचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आता कामाला लागले आहे. त्यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सव मंडळांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये “एक खिडकी योजना’ सुरु करण्यात आली आहे. आजपर्यंत (सोमवारी) पुणे पोलिसांकडे सुमारे अकराशे अर्ज आले आहेत. त्यापैकी एक हजार मंडळांना तत्काळ परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यातील पोलिस ठाण्याअंतर्गत “एक खिडकी योजना’ सुरु केली आहे. मंडळांचे अर्ज आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे, वाहतुक शाखा व विशेष शाखेच्या पोलिसांकडून मंडळाच्या जागेची पाहणी करणार आहेत. कागदपत्रांची तपासणी करुन एक तासातच परवानगी दिली जात आहे. विशेष शाखेकडे आत्तापर्यंत अकराशे अर्ज आले आहेत. त्यापैकी एक हजार अर्जांना परवानगी दिली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांच्यासमवेत परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची बैठक सोमवारी घेतली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली.
काय आहे एक खिडकी योजना
-गणेशोत्सव मंडळांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये “एक खिडकी योजना’ सुरु करण्यात आली आहे.
-यात स्थानिक पोलिस ठाण्याचे दोन पोलिस, वाहतुक शाखेचे एक व विशेष शाखेचे एक पोलिस अधिकारी व कर्मचारी मंडळांकडून आलेल्या परवानगी अर्जाची दखल घेतात.
-प्रत्यक्षात मंडळांची पाहणी, त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पाहणी करुन त्यांना परवानगी दिली जात आहे.