पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे . जुलै महिना सुरू होऊन 10 दिवस उलटले तरी महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी महिला या पैशांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच, आगामी 15 ते 17 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील काही दिवसांत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निधी वितरणावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. सामाजिक न्याय विभागाकडून मंजुरी मिळून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच, थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे हे पैसे खात्यात पाठवले जातील.

जर काही तांत्रिक कारणांमुळे 15 जुलैपर्यंत जूनचा हप्ता जमा झाला नाही, तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये महिलांना एकाच वेळी दिले जाऊ शकतात, अशीही एक नवी चर्चा सध्या सुरू आहे. यापूर्वी देखील मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्र करून 17 ते 20 मे दरम्यान महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. तर मे महिन्याचा हप्ता 15 जून नंतर मिळाला होता. त्यामुळे हप्त्याला थोडा उशीर झाला तरी पैसे सुरक्षित मिळतील, असे दिसते.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात साधारण 1 कोटी 70 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, सरकारने अद्याप या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांनी सोशल मीडियावरील कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ शासनाच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
छाननी प्रक्रियेमध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांचा हप्ता शासनाने तातडीने बंद केला आहे. नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या अशा अपात्र महिलांकडून पैशांची वसुली देखील केली जाऊ शकते.







