कल्याण: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील मामणोली परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. काही दिवसांपूर्वी जंगल भागात सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूमागील रहस्य ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघड केले आहे. मृत व्यक्तीची ओळख किशोरचंद्र कार्तिक साहू (वय 42, रा. देवगाव, ता. मुरबाड) अशी झाली आहे. एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची त्याच कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याचे तपासातून समोर आले असून, पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे. या हत्येप्रकरणी सौरभ विश्वनाथ गाल्हे (वय 24) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय कंठे (वय 28) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींच्या प्राथमिक जबाबानुसार, मृत साहू हे पदाने वरिष्ठ असल्यामुळे आपल्यावर सतत समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत होते, असा गंभीर आरोप आरोपींनी केला आहे. या कारणातून त्यांनी साहू यांना जंगल परिसरात नेऊन धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडील दागिने घेऊन तेथून निघून गेल्याचे तपासात समोर आले आहे.

तपास करताना पोलिसांना मृतदेहावरील कपड्यांवर एका कंपनीचे चिन्ह आढळून आले. या धाग्यावरून तपासाची दिशा निश्चित झाली आणि संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यात आला. मृताची ओळख समोर आल्यानंतर पोलिसांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. या चौकशीत सौरभ गाल्हे आणि ज्ञानेश्वर कंठे यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर दोघांनी या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.






