मुंबई: विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली महायुतीची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही प्रचंड चर्चेत असून जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजने अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. तसेच पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केलं.
महायुती सत्तेत आली तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं. आता मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करू असं ते म्हणाले आहेत. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केलं आहे.
एकीकडे विरोधक लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. तर विधानसभा निवडणुकीत जे आश्वासन मिळालं त्याची पूर्तता कधी होणार, 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याची राज्यातील महिलांना उत्सुकता होती. आता त्याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असे विधान केले आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ ची घोषणा
जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती. राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते. त्यानंतर जुलैपासून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये प्रत्यक्ष खात्यात हस्तांतरीत केले जात आहेत. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे, एकूण 3 हजार रुपये एकत्रित देण्यात आले होते.
योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश
या योजनेचा कोट्यावधी महिलांनी लाभ घेतला आहे. आणि महायुतीसाठी देखील ही योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आहे. महायुतीचे 230 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला पहिल्यांदाच 132 जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागांवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय प्राप्त झाला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयेच मिळाला आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशानंतर, मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढून 2100 होईल असे विधान केले आहे.