अहमदनगर : पोलीसांनी सोन्याचे दागिने चोरी गेलेल्या तक्रारदारांचा संक्रातीचा सण गोड केला आहे. अहमदनगरमधील वेगवेगळ्या ठिकाणी दोन दशकापूर्वी चोरी गेलेले सोने त्यांच्या मूळ मालकांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्यांच्या हातून देण्यात आले. त्यामुळे अहमदनगर येथील तक्रारदारांचा संक्रातीच्या सणाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
ज्ञानेश्वर लगडे (रा.सौरभ कॉलनी अहमदनगर) यांच्या घरी २००३ रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीत ५ सोन्याच्या बांगड्या चोरी गेल्या होत्या. त्या तब्बल २१ वर्षानंतर त्यांना परत देण्यात आल्या आहेत. मृत सुमनबाई क्षीरसागर (रा.ब्राह्मणगल्ली केडगांव अहमदनगर) या देव दर्शनासाठी गेल्या असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळयातील सोन्याची चैन लंपास केली होती. याबाबत २०१० रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आरोपीकडून जप्त केलेले सोने तब्बल १३ वर्षानंतर त्यांचा मुलगा सतीश क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आले.
मंदाबाई दुग्गड (रा. आगरकर मळा, अहमदनगर) यांच्या गळयातील सोन्याची चैन २०११ रोजी चोरीला गेली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सुमारे १२ वर्षानंतर त्यांची चोरीस गेलेली ६ ग्राम वजनाची सोन्याची चैन पोलिसांकडून त्यांना परत करण्यात आली.
आनंद नांदुरकर (रा.रामचंद्र खुंट, अहमदनगर) यांच्या लहान मुलाच्या कानातील सोन्याच्या बाळया सन २०१५ रोजी चोरी गेल्या होत्या. सुमारे ८ वर्षानंतर चोरी गेलेल्या २ ग्राम वजनाच्या कानातील बाळया त्यांना परत करण्यात आल्या आहेत.
इतक्या जुन्या चोरीतील ऐवज पुन्हा मिळाल्याने काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. भरल्या नयनांनी सर्व तक्रारदारांनी व त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो.हे.कॉ. तनवीर शेख, पो.हे.कॉ. दिपक साबळे व महीला पो.शि. जयश्री सुद्रीक आदींनी केली आहे.
‘अनेक दिवसांपासून हा विषय प्रलंबित होता. मा.न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना दागिने परत करण्यात आले. संक्रातीच्या मुहूर्तावर दागिने परत करता आले याचे निश्चितच समाधान वाटते.’
~चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक