मुंबई : मकर संक्रांतीचा सण उद्या म्हणजे 15 जानेवारीला आहे. बाजार पेठा सजल्या आहेत. वर्षारंभीच मोठा सण असल्याने भारतभर मकर संक्रांत वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. सराफा पेठा पण या दिवसासाठी सजल्या आहेत. गेल्या दहा दिवसांपासून सोने-चांदीत कमालीची घसरण झाली आहे. या दहा दिवसांत सोने 1300 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. ग्राहकांची पावलं सराफा दुकानाकडे वळली आहेत. पण सोने-चांदीने ऐन मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीच दरवाढीची चुणूक दाखवली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर संक्रांत आली आहे.
सोन्याच्या दरात वाढ
सोन्याने काही दिवस ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. गेल्या दहा दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरणीचे सत्र सुरु होते. मात्र, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 3 जानेवारीपासून सोने घसरले होते. 9 जानेवारीला 100 रुपयांनी तर 11 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. सोन्याच्या दरात 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. 13 जानेवारी रोजी सोन्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची दरवाढीला ढील
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे. नवीन वर्षात चांदीने पण ग्राहकांचा उत्साह दुणावला. चांदीत नरमाईचे सत्र दिसून आले. 3 जानेवारी रोजी 300 रुपये, 4 जानेवारीला 2000 रुपये, 8 जानेवारी रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली. 13 जानेवारी रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
गुडरिटर्न्सनुसार, सध्याच्या परिस्थीतीत सोने महागले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 62,515 रुपये, 23 कॅरेट 62,265 रुपये, 22 कॅरेट सोने 57264 रुपये झाले. 18 कॅरेट 46,886 रुपये, 14 कॅरेट सोने 36,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,530 रुपये झाला. सोने आणि चांदीवर वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कुठलाही कर, शुल्क नसते. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.