लोणी काळभोर : जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सूरज राजेश सरोज याने प्रथम क्रमांक पटकावला. सरोज याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे लोणी काळभोरसह जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात शनिवारी (ता. २५) जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत ६० किलो वजन गटात सूरजने प्रथम क्रमांक पटकावला. विभागीय स्पर्धेसाठी सूरजची निवड झाली आहे. सूरजला लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरचे प्रशिक्षक अमर गिरी, नरेश गिरी व गणेश नगिने यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले.
सूरजचे वडील राजेश सरोज हे मोलमजुरी करतात. तर आई धुणी-भांडी करते. या दोघांवर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. सरोजचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लोणी काळभोरमध्ये झाले आहे. पृथ्वीराज कपूर कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सूरजने हडपसर येथील एस.एम. जोशी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सूरज आता विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
दरम्यान, सूरजने मिळविलेल्या यशाबद्दल सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या प्रशिक्षकांनी त्याचे अभिनंदन करून सत्कार केला. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना सूरज सरोज म्हणाला की, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळालेले यश हे आई-वडील व प्रशिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मिळाले आहे. सुवर्णपदक पटकावल्यामुळे खूप आनंद झाला आहे. नातेवाईक व मित्रमंडळी फोन करून शुभेच्छा देत आहेत. अहमदनगर येथे १ ते ३ डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे.
सूरज सरोज व क्रीडा शिक्षकांचे कौतुक
पुणे जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील ६० किलो वजन गटात सूरज सरोज याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे सूरज सरोज व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.