मुंबई : रक्षाबंधन सोमवारी साजरा केला जात आहे. त्यानंतर सणासुदीचे दिवस खऱ्या अर्थाने सुरु होणार आहेत. त्यामुळे या सणासुदीच्या दिवसांत सोन्याची मागणी वाढली आहे. मुंबईतील झवेरी बाजारात रक्षाबंधनानिमित्त 400 ते 500 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांच्या मागणीत 25 टक्क्यांनी वाढ झाली असून, गुंतवणूकदारांकडून मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे.
सध्या दर कमी झाल्याने सोने खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी मानली जात आहे. कारण, येत्या काही महिन्यांत सोन्याचा भाव हा 75 ते 76 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम (जीएसटी शुल्काशिवाय) पर्यंत पोहोचू शकतो. सराफ व्यावसायिकांनीही येत्या सणासुदीची तयारी पूर्ण केली आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने मुंबई सराफा बाजारात छोटे-मोठे दागिनेही पाहिला मिळत आहे. सध्या सोन्याचे दर कमी झाल्याने मागणी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या दिवसांत हे दर वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या मते येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमती वाढू शकतात. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बँक आपल्या व्याजदरात कपात करणार की नाही, याचा परिणाम सोन्याच्या दरावर होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.