पुणे : बाल दिन बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. तर भारतात, स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपण वर्षातील ३६५ दिवसांचे दिनविशेष पाहिल्यास लक्षात येईल की रोज कुठला ना कुठला ‘खास दिवस’ असतो. दर वर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. केवळ भारतातमध्ये बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो.
यामागे काय इतिहास आहे ते जाणून घेऊया…
जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये ‘बाल दिन’च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. मात्र भारतात १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले.
चिमुरड्यांच्या लाडक्या ‘चाचा’ नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बाल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या.
त्यामुळे ‘बाल दिन’च्या निमित्ताने त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं असं ठरविण्यात आलं. आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.