पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईवडिलांच्या भांडणात दहा वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. दुचाकीवरुन जाणार्या पत्नीकडून मुलीला ओढल्याने मुलगी खाली पडून जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती निखील जुड पिकार्डो (वय-४६, रा. जलवायु विहार, खारघर, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील गेराज ग्रीन्जविल स्कायविलास सोसायटी येथे १५ नोव्हेबर रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी असून ते सध्या विभक्त राहत आहेत. त्यांना १० वर्षाची मुलगी आहे. ती आपल्या आईकडे राहत होती. त्या दोघांमध्ये घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. न्यायालयाने तिचे वडिलांनी कधी व कोठे भेटावे याबाबत आदेश दिला आहे. तसेच आरोपीने काय करावे व काय करु नये, याबाबतही न्यायालयाने सांगितले आहे. त्या आदेशाचा आरोपी पतीने भंग केला.
फिर्यादी या आपल्या स्कुटीवरुन मुलीला पाठीमागे बसवून खराडी येथील घरी जात होत्या. त्यावेळी सोसायटीच्या आवारात पतीने मुलीला गाडीवरुन ओढल्यामुळे फिर्यादी व त्यांची मुलगी खाली पडल्या. या घटनेत दोघी जखमी झाल्या आहेत. पतीने त्यांना बघुन घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार सोनवणे करीत आहेत.