बारामती : राज्यातील 150 मतदारसंघात घोळ झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेते पराभूत झाले असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. अनेक ठिकाणी मतांची चोरी झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. उत्तम जानकर यांनी सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आज बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत.
उत्तम जानकर यांच्याच मतदारसंघातील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले होते. ईव्हीएम विरोधात मारकडवाडीतील ग्रामस्थांनी बॅलेटवर मतदान घेण्याची तयारी केली होती. मात्र, त्यावर प्रशासनाने आक्षेप घेतला आणि ही मतदानप्रक्रिया बंद पाडली. या प्रकरणी मारकडवाडीत काहीजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हा हा विषय खूप चर्चेत आला होता.
उत्तम जानकर यांचा दावा काय?
आमदार उत्तम जानकर यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटले की, ईव्हीएममध्ये गडबड होत असून याची प्रक्रिया राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोग यांच्या लक्षात आणून देणार आहोत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मारकडवाडीत भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उत्तम जानकर म्हणाले की, जयकुमार गोरे यांनी 30 हजार मते चोरली असून त्यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला आहे. तर, बारामतीत अजित पवार 20 हजार मतांनी पराभव झाला आहे. जवळपास 150 मतदारसंघात घोळ करण्यात आला आहे. खरंतर, अजित पवार यांचे 12 आमदारच निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे 18 आणि भाजपचे 77 असे महायुतीचे 107 आमदार निवडून आले असल्याचा दावाही जानकर यांनी यावेळी केला आहे.
दिल्लीत आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाला भेटणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे.राज्यात पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.तसेच ईव्हीएमच्या कंट्रोल बॉक्समध्ये गडबड होत आहे. व्हीव्हीपॅटमधून जी पावती बाहेर येते, ती मतदारांच्या हातात दिली जावी आणि मतदार स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकेल, अशी परवानगी देण्याची मागणी जानकर यांनी केली आहे.