लोणी काळभोर (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीतील खोकलाईदेवी चौकातील जयमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चांदीच्या नवीन पादुका देवीला वाहण्यात आल्या. या पादुकांची ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महिला व पुरुष पारंपारीक वेशात सहभागी झाले होते. मंडळाचे वतीने यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तब्बल दोन वर्षानंतर शासनाने सार्वजनिक कार्यक्रमावरील निर्बंध हटवल्याने आदिमायेच्या आगमनानिमित विविधरंगी विद्यूतरोषणाईने उजाळलेली मंदिरे, त्यामध्ये केलेली आकर्षक सजावट, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, महिला व युवतींनी घटस्थापणेची केलेली तयारी या भक्तियुक्त आणी उत्साहपुर्ण वातावरणात आज पुर्व नवरात्रौवास सुरूवात झाली.
महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्राच्या लोकधारेचा कार्यक्रम, आर्केष्ट्रा अलबेला यासमवेत खास महिलांसाठी दांडिया महोत्सव व होम मिनिस्टर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, याचबरोबर विठ्ठल मंदिराशेजारी असलेल्या जय मल्हार मित्र मंडळ, रायवाडी येथील अखिल रायवाडी मित्र मंडळ, माळीमळा येथील राजे शिवछत्रपती शिवराय मंडळ, राहिंजवस्ती परिसरातील रेणूकामाता प्रतिष्ठान, तसेच लोणी स्टेशन परिसरातील पठारेवस्ती येथील जयभवानी बहुउद्देशीय सेवा मंडळ व खोले वस्ती येथील हनुमान मित्र मंडळ यांचे वतीने नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३७ ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे.