पुणे : पुण्यातील गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात भर रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार त्याची रवानगी येरवडा कारागृहात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका बड्या बापाच्या मुलाने भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र आता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्याच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज देखील दाखल केला आहे.
दरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करत सांगितले की, आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केले आहे का याबाबतचा तपास करायचा आहे.तसेच त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याने गाडी कोल्हापूरमध्ये लावली होती आणि तो कर्नाटकला जाणार होता, त्यामुळे या बाबतीत अधिक चौकशी करणे गरजेचे आहे. त्याने गाडी लावलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवायचे आहेत. या कारणांमुळे आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्याऐवजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता याबाबत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.