पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे शहरातील तापमानात घट होवू लागली आहे. शुक्रवारी (दि. १३) थंडीचा पारा १२.६ अंशावर आला होता. तर कमाल तापमानातही दोन अंशाने घट झाली असून ते २८.७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे असल्यामुळे शहरात थंडी वाढली आहे.
त्यामुळे कमाल व किमान तापमानात घसरु लागले आहे. दुपारच्या तापमानात घटले आहे. तर सायंकाळनंतर थंड वारे वाहत आहे. पहाटे थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. जर्किन, स्वेटर, कानटोपी, मफलर खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहर परिसरात किमान तापमानात घट झाली आहे. एनडीए येथे ११, पाषाण १२.४, कोरेगाव पार्क १६.६, वडगावशेरी १८.६ तर मगरपट्टा येथे १९.२ अंश सेल्सिअस तापमान होते. येत्या १४ ते १९ डिसेंबर दरम्यान, आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून दुपारी किंवा सकाळी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर सकाळी विरळ धुके पडण्याचा अंदाज आहे.