लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका चौकात पुणे महानगरपालिकेच्या ये-जा करणाऱ्या कचरा गाड्यातून भला मोठा कचऱ्याचा ठीग पडला आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला राहत असलेले रहिवाशी, दुकानदारांना व महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सांडलेल्या कचऱ्यावरून दुचाकी गाडी घसरून दुचाकी चालकाला अपघाताला सामोरे जावे लागले आहे. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झालाच आहे. शिवाय परिसरात दुर्गंधीही पसरली असून वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरून पुणे महानगरपालिकेच्या ये-जा करणाऱ्या कचरा गाड्यातून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन येथील रस्त्यावर कचरा सांडला जात आहे. शुक्रवारी (ता. १६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोलनाका येथे सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या एका डंपरमधून भला मोठा कचऱ्याचा ठीग सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडला आहे.
त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे वाहनचालकांना येथून मार्गक्रमण करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, शिळे व कुजलेले अन्नपदार्थ, फुटलेल्या काचेच्या बाटलीचे काच, रंगकाम व बांधकामाचे साहित्य, तेलगट पदार्थ आदींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे.
पुणे महानगरपालिकेचा कचरा पुणे-सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या बाजूला घेऊन जाण्यास मनाई असतानाही हा कचरा कोठे घेऊन जातात याबाबत कोणाला हि सांगता येत नाही. तसेच हा कचरा घेऊन जाताना डंपर मधून रस्त्याच्या मधोमध सांडला जात आहे. यापूर्वी पुणे महानगर पालिकेने एका खाजगी ठेकेदारावर कारवाई केली होती. तरीही आणखी कचऱ्याच्या डंपरमध्ये वाढ झाली आहे. नेमका हा कचरा जातो कोठे आणि याचे गौडबंगाल काय याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, भरधाव वाहन असल्याने हा कचरा रस्त्यावर पडल्याची माहिती सदर चालकाला नव्हती. त्यामुळे सदर ठिकाणावरून वाहनचालकांना सोलापूरच्या बाजूने जाताना कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. कवडीपाट या ठिकाणी जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे सदरचा कचरा लवकरात उचलावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, ” ग्रामपंचायतीचे कर्मचारी अपुरे असतात. पुणे महानगरपालिकेतील कचऱ्याच्या गाड्यातून वारंवार कचरा पडत आहे. याबाबत ग्रामपंचायतीतर्फे पुणे महानगरपालिकेला निवेदन देण्यात येणार आहे. यापुढे नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत आढळून आल्यास कडक धोरण अवलंबले जाईल.”