लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन ते इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. वेळीच कचऱ्याची उचल न झाल्याने हे ढिग दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. या कचऱ्यावर कुत्रे, मोकाट जनावरे, पक्षी जमत असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. तसेच या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण होत असून याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला आदर पूनावाला क्लीन सिटी या कंपनीचे कर्मचारी दोन्ही बाजूचा कचरा उचलत आहेत. मात्र कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे कमर्चारी कचरा उचलताना किंवा काढताना कोठेही आढळून येत नाहीत. तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रभागात रोज घंटागाडी फिरत नाही.
काही नागरिक वसाहतीतील वरच्या मजल्यावरून खाली येऊन कचरा टाकण्यापेक्षा एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून सकाळी कमावर जाताना ओढ्याच्या शेजारी, महामार्गाच्या कडेला, आडवळणावर, मोकळ्या जागी, उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणच्या चौकाच्या ठिकाणी सर्रासपणे कचरा टाकला जातो. ग्रामपंचायतीची कचरा गाडी रोज आली तर बाहेर कचरा टाकणाऱ्या नागरिकांची संख्या आपोआपच कमी होणार आहे.
ग्रामपंचायत हद्दीत व पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला सुशिक्षित आणि नोकरदार सकाळी कामावर जाताना प्लास्टिकच्या पिशवीत कचरा भरून सर्रासपणे उघड्यावर व रस्त्याच्या कडेला कचरा फेकताना आढळून येत आहेत. यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र सध्या कदमवाकवस्तीत पहायला मिळत आहे.
दरम्यान, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने वसाहती आणि ठिकठीकाणी स्वतंत्र कचराकुंड्या ठेवल्या आहेत. या कुंड्या भरून वाहत आहेत तरीही कचरा नेहला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून एकप्रकारे रोगराईला आमंत्रण मिळत आहे.
याबाबत कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, “मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे कचरा उचलण्यात आला नाही, ज्या ठिकाणी कचऱ्याचे ठीग आहेत. ते सर्वच्या सर्व ठीग येत्या दोन दिवसात उचाल्यात येणार आहेत.