पनवेल : पनवेलच्या शिरढोण येथील वेअरहाऊसवर मंगळवारी पहाटे ३० ते ३५ दरोडेखोरांनी येथील सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून या गोदामातील तब्बल ५ कोटी रुपये किमतीची सुपारी व मिऱ्या असा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या वेअरहाऊसमध्ये कस्टम विभागाने जप्त केलेला सुपारी व मिरीचा माल ठेवला होता.
सन २०२२ मध्ये अल्फा इंडस्ट्रीज, हायलॅण्ड इंटरनॅशनल आणि फ्युचर फस्ट इंटरनॅशनल या तीन कंपन्यांनी परदेशातून कस्टम ड्युटी चुकवून कोट्यवधी रुपये किमतीची सुपारी व मिरी या मालाची आयात केली होती. डिसेंबर २०२२ मध्ये जेएनपीटी बंदरात हा माल आल्यानंतर कस्टम ड्युटी भरली न गेल्यामुळे कस्टम विभागाने या तिन्ही कंपन्यांचा कोट्यवधी रुपये किमतीचा माल जप्त करून पनवेलच्या शिरढोण येथील वेगवेगळ्या गाळ्यांमध्ये ठेवला होता. याच मालाची लूट करण्यासाठी मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ३० ते ३५ दरोडेखोरांच्या टोळीने येथील आलसेन शिपिंग अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. कंपनीच्या वेअर हाऊसवर दरोडा टाकला.
या दरोडेखोरांनी तेथील सायमन पॉल या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून त्याला ठार मारण्याची धमकी देऊन त्याचे हातपाय बांधले. तसेच जगन्नाथ पाटील या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाला देखील जीवे मारण्याची धमकी देऊन कटर मशीनच्या सहाय्याने गाळ्याचे टाळे तोडून येथील ५ कोटी रुपये किमतीचा सुपारी आणि मिरी असा माल सोबत आणलेल्या कंटेनरमध्ये भरून सुरक्षा रक्षकांचे मोबाईल फोन घेऊन तेथून पसार झाले. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गत फेब्रुवारी महिन्यामध्ये याच वेअरहाऊसच्या भितीला भगदाड पाडून वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आलेल्या तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये किमतीच्या सुपारी व मिरी या मालाची चोरी करण्यात आली होती. तसेच त्या मालाच्या जागी त्याच्यासारखा दिसणारा दुसरा माल ठेवण्यात आला होता. ही चोरी वेअरहाऊस चालक आणि मालकाच्या संगनमताने झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कस्टम विभागाने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिसांनी या दोघाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता पुन्हा याच गोदामावर जबरी दरोडा टाकण्यात आला आहे.