वाघोली : जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघोली आव्हाळवाडी रस्त्यावरील बाजारतळाजवळ मंगळवारी (ता. 24) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला त्वरित अटक केली आहे.
ओम दादाराव मस्के (वय 19, रा. दुबेनगर, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आही. तर त्याचे साथीदार यश माणिक शिरसाठ (रा. आव्हाळवाडी), निखील कांबळे (रा. जे जे नगर, वाघोली), करण चव्हाण (रा कटकेवाडी), प्रसाद मस्के, साहील राठोड, प्रथमेश श्रीखंडे व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आदित्य दीपक कांबळे (वय 18. रा वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य कांबळे व त्याचा मित्र रोहन जाधव हे मंगळवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. दुचाकीवरून जात असताना, त्यांची दुचाकी वाघोली आव्हाळवाडी रस्त्यावरील बाजारतळाजवळ आली असता, त्यांच्या पाठीमागून तीन मोटारसायकलवर आरोपी आले होते. त्यानंतर त्यातील आरोपी ओम मस्के याने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन हातातील कोयत्याने फिर्यादी आदित्य कांबळे याच्या खाद्यांवर वार करुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर ओम मस्के याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांचा पाठलाग केला. फिर्यादी कांबळे यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी हातातील शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोराळे करीत आहेत.