लोणी काळभोर (पुणे)- गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी आगामी गणेशोत्सवात शासनाचे सर्व नियम व कायद्यांचे कसोशीने पालन करुन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करावा असे आवाहन पुणे शहर पोलीसांच्या परिमंडल ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे केले आहे.
कदमवाकवस्ती येथील मधबन मंगल कार्यालयात ३१ ऑगस्ट पासून सुरु होणा-या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने विघ्नहर्ता न्यास पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नम्रता पाटील यांनी वरील आवाहन केले.
यावेळी सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे, विघ्नहर्ता न्यासचे डॉ. मिलींद भोई, प्रताप निकम, सलिम शेख, महेंद्र आगरवाल, गणेश शिंदे, पोलीस ठाण्यातील सर्व आधिकारी व कर्मचारी, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, हवेली तालुका सोशल मिडीया परीषदेचे तालुका उपाध्यक्ष सचिन माथेफोड, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना नम्रता पाटील म्हणाल्या, मागिल दोन वर्षे करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत. ग्रामीण व शहर असा कुठलाही भेद न करता पोलीस तुम्हाला सहकार्य, मदत करण्यासाठीच आहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शासनाचे सर्व नियम व कायदे यांचे पालन करुन उत्सव साजरा करावा. मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारी परवानगी पोलीस ठाणे पातळीवरच मिळेल.
नम्रता पाटील पुढे म्हणाल्या, वाहतुकीला अडथळा होईल असा मंडप घालू नये, अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, मंडपामध्ये श्रींच्या मुर्तीच्या व महिलांच्या सुरक्षेसाठी आपले कार्यकर्ते नियुक्त करावेत, प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूकीमध्ये वेळेचे बंधन कसोशीने पाळावे, गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. या नंतर ही काही अडचण आल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन यावेळी नम्रता पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले शहर पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या विघ्नहर्ता न्यासचे स्पर्धेत आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरी गणेश मंडळांने बक्षीस मिळवावे, त्यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोत्कृष्ट मंडळांना लोणी काळभोर पोलीसांच्या वतीने तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शाहीर महेश खुळपे यांनी देशभक्तीपर पोवाडे सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. नवनियुक्त विघ्नहर्ता न्यास परीक्षक मंडळाचा सत्कार यावेळी नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खुळपे यांनी तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांनी मानले.