हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या….गणपती चालले गावाला…. चैन पडेना आम्हाला…. या गजरात पूर्व हवेलीतील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी भावपूर्ण वातावरणात व जड अंत: करणाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी आपला गणपती अखिल तळवाडी मित्र मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने शिवगर्जना ढोल पथकाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. तर जय महाराष्ट्र मित्र मंडळाची मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने सुरू झाली आहे.
उरुळी कांचन येथे सार्वजनिक मंडळांनी गणरायांची रथांतून आकर्षक सजावट करून मिरवणूक काढण्यात येत आहे. डीजे व गुलालमुक्त विसर्जन मिरवणुकीच्या आवाहनाला सर्वच गणेश मंडळांनी पाठिंबा दिला असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक ढोल- ताशा, तुतारी, सनई व टाळांच्या गजरात मिरवणूक पार पडत आहे. मिरवणुकीत लहान मुले-मुली, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास सर्व महत्त्वाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होणार आहे.
दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेत आहे. श्रीगणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केले जाणार आहे.
दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर उरुळी कांचन सह परिसरात शुक्रवारी (ता. ०९)सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जनाला उत्साहात सुरूवात झाली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने मूर्तीदान उपक्रम राबवला जात आहे तसेच तांबे वस्ती परिसरात ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल तांबे यांच्या वतीने परिसरात कृत्रिम हौद बनविण्यात आला होता.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे.