सोलापूर : हरणा नदीवर पूल नसल्याने अंत्यविधी चक्क पाण्यातून काढल्याची धक्कादायक घटना पितापूर (ता. अक्कलकोट) येथे उघडकीस आली आहे. आणि या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
मिळालेल्या माहितीनुसार, पितापूर – आकांतळा या गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची कमी आहे. त्यातच पितापूर गावाच्या परिसरात जोरदार पावसाने सलग चार दिवस हजेरी लावली होती. हरणा नदीवर पूल पाण्याखाली गेला. पितापूर गावातील नूरअली साहेब अली भंडारी यांचे निधन झाले होते. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना चक्क नदीतून वाट काढत स्मशानभूमी गाठावी लागल्याचे विदारक चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.
पितापूर ग्रामस्थांना एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर अंत्यविधीसाठी नेताना नदीतील कंबरभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. स्मशानभूमीकडे पुलाची उंची वाढवावी. शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे. अशी मागणी पितापूर येथील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, एकीकडे देश स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असतानाच आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी सुविधेकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत. पितापूर (ता. अक्कलकोट) येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कंबरेभर पाण्यातून नदी ओलांडून स्मशानभूमीकडे अंत्यविधीसाठी प्रेतयात्रा न्यावी लागत आहे.